भरवस्तीत बिबट्याचा धुमाकुळ सुरूच.
परिसरातील नागरिक भयभित.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली/आष्टी-: बिबट्याने आता चामोर्शी तालुक्यातील आष्टी गावात धुमाकुळ घातला असुन गावातील भरदिवसा वस्तीतील कोंबड्या पळवुन नेवुन फस्त केल्याची बाब दि.16 आँक्टोबरला सकाळी उघडकीस आली आहे.परिसरात बिबट्याची दहशत अजूनही कायम असतांना आता तर चक्क आष्टीतील भरवस्तीत या बिबट्याने धुमाकूळ घातला असल्याचे चित्र दिसून येत आहे.दि.15 ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास बिबटयाने आष्टी गावातील भरवस्तीत प्रवेश केल्याने परिसरातील नागरिकामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.दि.16 आक्टोबरला सकाळच्या सुमारास आष्टी बस स्टॅण्ड परिसरातील आलापल्ली रोडवरील वर्गीस अण्णा यांच्या वेल्डिंग दुकानासमोर बिबट्याचा पायाचे ठसे आढळून आले.तसेच वार्ड क्रमांक 3 मधील अशोक ठाकूर यांच्या घरच्या कोंबड्यावर बिबट्याने हल्ला करून पळवुन नेले.त्यामुळे आष्टीतील नागरिक धास्तावले आहेत.दोन दिवसापुर्वी पहाटेच्या सुमारास आष्टी पेपर मिल वसाहती परिसरामध्ये बिबट्याचे दोन बछडे आढळून आले होते.ते दोन्ही बछडे वन विभागाच्या ताब्यात असल्याने त्यांच्या शोधात मादी बिबट्या सैरावैरा भरकटत असल्याची दाट शक्यता आहे.आष्टीत रात्रीच्या सुमारास धुमाकूळ घालणारा आपल्या पिलांच्या शोधात असलेला हाच मादी बिबट्याच असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.तसेच बसस्टॅण्ड ला लागून असलेल्या पंदिलवार यांच्या घरामोरील परिसरात तीन दिवसा पासून रात्रीच्या सुमारास कुत्रे मोठ्या प्रमाणात भुंकत असल्याचे शेजारील नागरिकांना आढळून आल्याने तीन दिवसांपासून हा बिबट्या या परिसरात येत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.या मादी बिबटया मुळे मानवी व इतर पशु धनाच्या जीविताला धोका असून रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडणे नागरिकांना जिकरीचे झाले आहे .पशुधनाची किंवा मानवाची हानी होण्याअगोदर याची दखल घेऊन वनविभागाने तातडीने या धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी आष्टी येथील नागरिकांनी केली आहे.