किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर : कोरोनाला रोखण्यासाठी जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करणाऱ्या देवदूतांमध्ये महिलाही मागे नव्हत्या. पातुरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नवरात्रीचे औचित्य साधून अशा महिलांना अनोखी मानवन्दना वाहिली.
संकटकाळात आदिशक्तीने विविध रूप घेऊन मानवी जीवनाला सुखकर बनवल्याचा इतिहास सांगितला जातो. सध्या संपूर्ण जगाला कोरोना या महामारीने ग्रासले आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत अनेक कोरोना योद्धे लढत आहेत. या लढ्यात महिला सुद्धा आपल्या जीवाचे रान करीत आहेत. त्यांच्या रूपाने कलियुगातील त्या आधुनिक नवदुर्गाच आहेत. अशा आधुनिक नवदुर्गाचे नमन नवरात्रीच्या पर्वावर व्हावे हीअभिनव संकल्पना पातुरच्या चिमुकल्यानी साकारली.
किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल च्या विद्यार्थिनीनी कोरोना काळात काम करणाऱ्या महिला पोलीस, महिला डॉक्टर, नर्स, महिला चालक, महिला पत्रकार, शेतकरी, जवान, शिक्षिका, वीजकर्मचारी, सफाई कामगार यांच्या रूपात आधुनिक नवदुर्गा अवतरल्या अशी संकल्पना साकारली. नवरात्रीच्या पर्वावर अशा आधुनिक नवदुर्गेचा जागर करीत त्यांच्या कार्याला सलाम केला. शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे व कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांच्या मार्गदर्शनात हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सुलभा परमाळे यांनी उपक्रमाचे नियोजन केले. तर शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, नितु ढोणे, वंदना पोहरे, शीतल कवडकर, किरण दांडगे, अश्विनी अंभोरे, अविनाश पाटील, बजरंग भुजबटराव, जयेद्र बोरकर,रुपाली पोहरे आदींनी परिश्रम घेतले.











