जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण यंदाच्या वर्षी कासवगतीने भरत असून, शनिवारी सायंकाळी उजनीतील पाणीसाठा 95 टक्के इतका झाला होता. दिवसभरात एक टक्क्याने वाढ झाली असून, दौंड व बंडगार्डन येथील विसर्ग सुरू आहे.सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठय़ात यंदाच्या वर्षी सावकाश वाढ होत आहे. गतवर्षी याच कालावधीत शंभर टक्क्यांहून अधिक भरले होते. शनिवारी दिवसभरात दौंड येथून विसर्गात वाढ केल्याने सायंकाळी उजनी धरणातील पाणीसाठा 95.39 टक्के इतका झाला होता. दौंड येथून 4905 व बंडगार्डन येथून 2916 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उजनीत सध्या 114.76 टीएमसी पाणीसाठा असून, उपयुक्त पाणीसाठा पातळी 51.10 टीएमसी झाली आहे. दिवसभरात एक टक्क्याने पाणीपातळीत वाढ झाली आहे. उजनी पूर्णक्षमतेने भरण्यासाठी भीमा खोऱ्यात पावसाची गरज आहे.
उजनी धरणातून सध्या सीना, माढा व दहीगाव योजनेत पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने हे पाणी सीना नदीत येत आहे. त्यामुळे पाण्यात अचानक वाढ झाली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सायंकाळी पाचपासून सीना नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने करमाळा तालुक्यातील बालेवाडी व बिदर गावाजवळील नदीकाठी असलेल्या शेतात पाणी आले असून, पिके पाण्याखाली गेली आहेत व नागरी वस्तीतही पाणी शिरले आहे. त्याचप्रमाणे बटोबा, खडकी, आळजापूर, तरटगाव, पोरेगाव, निलज, बोगरव, करंजे, भालेवाडी गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे


