जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातुर/पैसे कमविण्यासाठी कोण कधी काय करेल सांगता येत नाही. लातूर शहरातील पानटपरीवर झोपेच्या गोळया विक्री करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी छापा टाकून तब्बल ६०० गोळया जप्त केल्या आहेत. या प्रकरणी तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशात सर्वाधिक गुटखा, सुपारी, पानमसाला विक्री होणारे शहर म्हणून लातूरची ओळख आहे. किक येण्यासाठी अनेकजण अनेकविध प्रकार करत असतात. राज्यात गुटखाबंदी असली तरी लातूर शहरात गुटखा, सुपारी विकली जाते. आता तर थेट झोपेच्या गोळयाच विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विवेकांनद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील कश्मीर पान स्टॉल, औसारोड येथे बेकायदेशीरपणे झोपेच्या गोळयांची विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. अन्न भेसळ अधिकाऱ्यांना सोबत घेत पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी रुखोद्दीन शेख आणि नसीन अल्लाहुद्दीन शेख (दोघेही रा. चांडेश्वर, ता. लातूर) हे झोपेच्या गोळयांची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या ताब्यातून एका बॉक्समधील 600 गोळया तसेच मोबाईल जप्त करण्यात आला. हा माल त्यांना अजय दांडे (रा. बस्वकल्याण) पाठवत असल्याचे त्यांनी सांगितले. तिघांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे