अमरावती : राष्ट्रीय पोषण आहार योजनेंतर्गत महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरले असून, योजनेच्या अंमलबजावणीत अमरावती जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषण आहार महत्वपूर्ण असून, यापुढेही हा उपक्रम खेडोपाडी, पाड्यांपाड्यांवर सर्वदूर राबवावा. केवळ पोषण महिन्याच्या स्पर्धेपुरतेच नव्हे तर वर्षभर जोमाने काम करत कुपोषणाला हरवण्याचा निर्धार करा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
आरोग्य विभागातर्फे देशभऱ सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय पोषण आहार महिना हा उपक्रम राबविला जातो. या महिन्यात महिला व बालकल्याण विभाग, तसेच आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून प्रत्येक बालक सुदृढ व्हावे यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत राज्य देशात अग्रेसर ठरले असून, अमरावती जिल्हा राज्यात दुस-या क्रमांकावर आहे. महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर यांनी स्वत: ठिकठिकाणी अंगणवाड्यांना भेटी देऊन अंगणवाडी सेविका, पालक यांच्याशी संवाद साधून पोषण आहार उपक्रमाला चालना दिली. अंगणवाड्यांच्या विकासासाठी अनेक निर्णयांची अंमलबजावणी केली व प्रशासनालाही या उपक्रमांबाबत सातत्याने प्रोत्साहन दिले.
यंदा पोषण आहार महिन्यानिमित्त गंभीर तीव्र कुपोषण असलेल्या मुलांची ओळख पटविणे आणि पाठपूरावा करणे” तसेच “पोषण बाग विकसित करणे” हे ध्येय ठरविण्यात आले. राष्ट्राच्या उत्तम उभारणीसाठी बालकांची जडणघडण योग्यरित्या होणे ही काळाची गरज आहे. बाळ मातेच्या गर्भात असते तेव्हापासून आणि जन्मल्यानंतर त्याची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी पोषण आहाराबाबत उपक्रम सातत्याने वर्षभर राबवले गेले पाहिजेत. विशेषकरून मेळघाटात गावोगाव, पाड्यापाड्यांवर हे उपक्रम राबवावेत, असे निर्देश महिला व बालविकास मंत्र्यांनी दिले.
जिल्ह्यात या उपक्रमात आशा, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून गावपातळीवर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. आरोग्य विभागामार्फत लसीकरणाला चालना देण्यात आली. गर्भवती महिलांना आरोग्य व पोषणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यासोबतच अंगणवाडी परिसरात शेवगा व फळझाडांची लागवड करणे, सकस आहाराचे महत्व पटवून देण्यासाठी विविध पाककृती स्पर्धांचे आयोजन, योगशास्त्राचे प्रशिक्षण या उपक्रमांची जोड देण्यात आली. त्यामुळे अमरावती जिल्ह्याने राज्यात दुस-या क्रमांकावर पोहोचला. यापुढेही हे उपक्रम सातत्याने राबविण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी घोडके यांनी दिली.