अमरावती : राज्याच्या आर्थिक उभारणीतील शेतकरी बांधवांचे योगदान लक्षात घेऊन स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे औचित्य व गांधीजयंतीचा मुहूर्त साधून उद्यापासून (2 ऑक्टोबर) शेतकरी बांधवांना डिजीटल सातबा-या प्रती विनामूल्य व घरपोच देण्यासाठी विशेष मोहिम महसूल विभागातर्फे जिल्हाभर राबविण्यात येत आहे.
महसुली लेखाकंन पध्दतीविषयक गाव नमुना क्र. 7/12 अधिकार अभिलेखपत्रक महसूल विभागाकडून अद्ययावत करण्यात आले असून, 7/12 चा उतारा सर्व संबंधितांना समजण्यासाठी अधिक सोपा व बिनचूक करण्यात आलेला आहे. राज्याच्या आर्थिक उभारणीतील शेतकऱ्यांचे योगदान विचारात घेऊन स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचा मुहूर्त साधून सातबा-याच्या प्रती तलाठ्यांमार्फत खातेदारांना विनामूल्य व घरपोच देण्यात येणार आहेत. ही विशेष मोहिम राबविण्याबाबत सर्व तहसीलदारांनी अचूक नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.
डिजीटल भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, ई– महाभूमीअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या आज्ञावलीमधून संगणकीकृत डिजीटल स्वाक्षरीने प्राप्त होणाऱ्या अधिकार अभिलेखविषयक गाव नमुना नं. 7/12 अद्ययावत उताऱ्याच्या प्रती गावोगाव तलाठ्यामार्फत प्रत्येक खातेदाराला घरोघर जाऊन विनामूल्य देण्यात येतील. सातबा-यात काही दुरुस्ती आवश्यक असल्यास शेतक-यांनी फीडबॅक फॉर्ममध्ये नोंद करावी. त्यांना आवश्यक दुरुस्त्या तत्काळ करून देण्यात येतील, अशी माहिती महसूल उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले यांनी दिली.
ग्रामसभेत होणार उता-याचे वाचन
गांधीजयंतीनिमित्त होणाऱ्या विशेष ग्रामसभेमध्ये खाते उताऱ्याचे वाचन करण्यात येणार आहे. यानिमित्त वर्षभरात मंजूर विनातक्रार फेरफार नोंदीची माहिती ग्रामसभेला देण्यात येणार आहे. 15 ऑगस्ट 2021 पासून सुरू झालेल्या ई-पीक पाहणी न केलेल्या खातेदार यादीचे वाचन करणे व महसूल विभागाच्या सामान्य जनतेसाठी असलेल्या इतर ऑनलाईन सुविधांची माहिती ग्रामसभेला देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.