अकोला,दि.29 – डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेमार्फत ग्रामीण भागात दि.28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर दरम्यान आधार कार्डला मोबाईल लिंक करण्यासाठी मोहिम राबवण्यात येत आहे. पोस्टमन किंवा जवळील पोस्ट ऑफिस येथे आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक करण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पोस्ट विभागाचे प्रवर डाक अधीक्षक यांनी केले आहे.
अकोला डाक विभागातील 45 उपडाकघर तसेच 354 शाखा डाक घरांमधून ही सुविधा दिली जाणार आहे. ही मोहिम ग्रामपंचायतस्तरावर देखील राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड व मोबाईल नंबर असणे आवश्यक राहील. शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी नजिकच्या टपाल कार्यालयात किंवा आपल्या क्षेत्रातील पोस्टमन यांच्याशी संपर्क साधावा.या सेवेकरीता पन्नास रुपये शुल्क आकारण्यात आले आहे, अशी माहिती डाक विभागाव्दारे देण्यात आली आहे.
लिंक करण्याचे फायदे : पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्टकरीता, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्जाकरीता, बँक तसेच डिमॅट खाते ओपन करण्यासाठी, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी, आधार कार्ड तयार करणे किंवा किरकोळ बदल करणे, आधार कार्डचा इतरांकडून होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी यासारखे फायदे आधार कार्ड-मोबाईल लिंक केल्यामुळे होतात.