अभिजीत फंडाट ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे
अकोला- गेल्या काही दिवसांमध्ये अकोला जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानाची भरपाई मिळण्यासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत. परंतु झालेल्या नुकसानाची माहिती ई पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून पाठविण्याच्या प्रशासनाच्या निर्देशामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसमोर नवी समस्या निर्माण झाली. वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचा महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वे करणे अपेक्षित आहे. परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानाचे फोटो ई पीक पाहणी ॲप वर टाकण्यासाठी सांगण्यात आले असल्याचे समजते. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अजूनही जाता येत नाही. अनेक शेतांचे रस्ते बंद झाले. त्यामुळे फोटो काढण्यासाठी शेतात जायचे कसे? तसेच अनेक शेतकऱ्यांकडे फोटो काढून ॲप वर टाकण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल नाहीत. ज्यांच्याकडे आहेत त्यांना ॲप कसे डाऊनलोड करावे व त्यावर फोटो कसे टाकावे याची माहिती नाही. काही शेतकऱ्यांना तर मोबाईलच समजत नाही. अशा परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांना नुकसानीचे फोटो पिक पाहणी ॲप वर टाकण्यासाठी दिलेल्या सूचनांमुळे अतिवृष्टी ग्रस्त शेतकरी आणखी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सर्वे करावा किंवा ही अट रद्द करावी,अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी केली आहे.