महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.27:-भद्रावती शहरातील तरुण उद्योजकाचा अल्पशा आजाराने मृत्यू झाल्याने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रात माहितीनुसार, येथील सूर्यमंदीर वार्डातील रहिवाशी वसंतराव सातपुते यांचे सुपुत्र रितेश सातपुते(२८) यांना ताप आला असता त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथेही त्यांचा आजार कमी न झाल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे त्यांना दि.२५ आॅगस्ट रोजी रात्री नागपूरला नेत असताना बुटीबोरी गावाजवळ रात्री १०.३० वाजता रस्त्यातच त्यांचे निधन झाले.डेंगू या आजाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
रितेशने अभियांत्रिकीची पदवी मिळवून वरोरा तालुक्यातील पिंपळगाव येथे सिमेंट उद्योग सुरु केला होता.एक वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि भाऊ असा आप्त परिवार आहे. येथील पिंडोनी स्मशानभूमित त्यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सहकार महर्षी अॅड.बाबासाहेब वासाडे, दिनेश पाटील चोखारे, अफझलभाई, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, धनोजे कुणबी समाजाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग टोंगे आणि भद्रावती शहरातील गणमान्य नागरिक व आप्तेष्ट उपस्थित होते.यावेळी अॅड.बाबासाहेब वासाडे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली.