महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती,दि.२०:-अचानक लागलेल्या भीषण आगीत गुरांचा गोठा जळून खाक होण्याची घटना दि.१९ आॅगस्ट रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास भद्रावती तालुक्यातील शेगाव (खुर्द) येथे घडली.प्राप्त माहितीनुसार शेगाव (खुर्द) येथील शेतकरी धनंजय विनायक भागडे हे शेतीसोबतच जोडधंदा म्हणून बकरी पालन व्यवसाय करतात. घटनेच्या दिवशी ते गावाच्या शेजारी मोकळ्या जागेत बक-या चरायला घेऊन गेले होते.तर त्यांची पत्नी शेतात गेली होती.त्यामुळे घरी कोणी नव्हते. दरम्यान, दुपारी ४ वाजताच्या सुमारास घरामागे असलेल्या गोठ्याला अचानक आग लागली. पहाता-पहाता आगीने उग्र रुप धारण केले. गोठ्यातून धुर निघत असल्याचे शेजारच्यांच्या लक्षात येताच त्यांनी गावात ही माहिती दिली.त्यामुळे आग विझविण्याकरीता सर्वत्र धावपळ सुरु झाली. गावातील युवा वर्ग आणि नागरिक गुंड,बादल्या आणि मिळेल त्या साधनाने आग विझविण्याचा प्रयत्न करु लागले.भद्रावती येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.शेखर भिवधरे यांची बोअरवेल सुरु करुन पाईपद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला.शेवटी दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात ग्रामस्थांना यश आले. परंतू तोपर्यंत भागडे यांचा संपूर्ण गोठा आगीच्या भक्षस्थानी पडला होता. यात भागडे यांचे शेती उपयोगी साहित्य वखर,नांगर व तणस, कुठार असा गुरांचा चारा आणि बकरीचे ४ पिल्ले असे एकूण जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले. ही आग विझविण्याकरीता हरिश्चंद्र जीवतोडे, अरुण क्षीरसागर, मोहीत भोगेकर, महादेव चौधरी, अमोल जीवतोडे, आशू मानकर, राकेश जीवतोडे, शुभम हजारे आणि गावातील इतर युवकांनी सहकार्य केले.दरम्यान,आज शुक्रवारी तलाठी श्रीकांत गीते यांनी घटना स्थळाचा पंचनामा केला. यावेळी पोलिस पाटील बाबुलाल आत्राम, सरपंच मोहीत लभाने, ग्रा.पं.सदस्य महेश क्षीरसागर आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतक-यास तातडीने शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे.











