गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : तेल्हारा शहर व तालुक्यात तापाची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे, डेंग्यू, मलेरिया, टायफाईडचे रुग्ण अनेक घरांमध्ये आढळून येत आहेत. शहरात व तालुक्यातील अनेक गावांमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य असून नाल्या आणि गटारी तुंबल्याने गावात आजार वाढले आहेत. तेल्हारा तालुक्यातील ग्रामपंचायतीकडून मात्र याकडे चक्क दुर्लक्ष केल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. पाच ते सहा दिवसांपासून लहान मुलांमधे देखील साथीची लागण सुरू झाल्याचे चित्रआहे. यामध्ये ताप, अंगावर पुरळ येणे, डोकेदुखी ही लक्षणे दिसून येत आहेत. वैद्यकीय तपासणी अहवालावरून काहींना डेंगू आजाराची लागण झाल्याचे निदान झाले आहे. तेल्हारा शहर व तालुक्यातील अनेक गावातील बरेच रुग्ण तेल्हारा व अकोला येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. गोर गरीब रुग्ण अजूनही गावात तापाने बेजार आहेत, तेथे तातडीने आरोग्य पथक पाठवुन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून गावात धुर फवारणी करावी आणि योग्य मार्गदर्शन करावे अशी मागणी गावकरी मंडळी करीत आहेत. तेल्हारा तालुक्यातील गावांतील समस्याबाबत ग्रामपंचायतला काही घेणे देणे नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील गावांमधे आरोग्य संदर्भात विविध समस्या वाढीस लागल्या आहेत. कुठलेही नियोजन नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे.


