महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती, दि.१४:-शासनाच्या आदेशानुसार कृषी विभागातर्फे भद्रावती तालुक्यात रानभाजी महोत्सव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून ठिकठिकाणी रानभाज्यांचे स्टाॅल्सलावले जात आहेत.दि.१४ ऑगस्ट रोजी येथील नगर परिषदेच्या परिसरात तालुका कृषी अधिकारी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पं. स. सभापती प्रवीण ठेंगणे, जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब ब-हाटे,वरोरा उपविभागीय कृषि अधिकारी आर.टी.जाधव, तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. रानभाजी महोत्सवात रानभाजी प्रदर्शनी व विक्री स्टॉल्स लावण्यात आले होते. यावेळी नागरिकांना रानभाजी व त्यापासून तयार करण्यात येणारे पदार्थ याबाबत माहीती देण्यात आली.तसेच आत्मा योजनेअंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गटामार्फत खाद्यपदार्थ विक्री करिता ठेवण्यात आले होते. महोत्सवात प्रगतशील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट, शेतकरी मित्र, बचत गटाच्या महिलांनी मोठ्या संख्येत सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱी यांनी परिश्रम घेतले.