शिवसेना उबाठा गटाकडून कुटुंबाला आर्थिक मोबदला देण्याची मागणी.
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि 3. तालुक्यातील बरांज येथील कर्नाटक एमटा कंपनीत कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी यासाठी अन्य कर्मचारी व गावकरी रुग्णालय परिसरात गोळा झाल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र भद्रावती पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला योग्य तो मोबदला देण्यात येईल असे आश्वासन कंपनी व्यवस्थापनाकडून मिळाल्याने हा तणाव निवळला.सदर कंपनीतील एका ठेकेदारी कंपनीत काम करणाऱ्या जितेंद्र राम अवतार कर्णधार वय 36 वर्ष राहणार देवालय सोसायटी या कामगाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला. कुटुंबाला कंपनी आर्थिक मदत देण्यास टाळाटात करीत असल्यामुळे मृतकाच्या कुटुंबाने शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे, व तालुका प्रमुख नरेंद्र पढाल यांच्याशी संपर्क साधला असता ते तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात हजर झाले. त्यांनी मृतकाच्या कुटुंबाची भेट घेतली व कुटुंबास वीस लक्ष रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली.त्यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. हा तणाव वाढण्याचे चिन्ह दिसत असतानाच भद्रावती पोलिसांनी हस्तक्षेप करीत हा वाद मिटवला. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने नरमाईचे धोरण स्वीकारत मृतकाच्या कुटुंबाला योग्य आर्थिक मोबदला देण्याचे आश्वासन दिले. सदर कंपनीतर्फे कुठल्याही कामगारांचे ईपीएफ व ईएसआयसी भरण्यात येत नसल्याचे समजते. मृतकाच्या कुटुंबास आर्थिक मोबदला न मिळाल्यास शिवसेनेतर्फे कंपनी बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हा प्रमुख मनीष जेठाणी ,उपजिल्हा प्रमुख युवासेना महेश जीवतोडे, अमित निब्रड, दिनेश यादव, तथा विविध पक्षाचे नेते , एम्टा कंपनीत ठेकेदारीत काम करणारे मजदूर , देवालय सोसायटी मधील नागरिक ग्रामीण रुग्णालयात उपस्थित होते.