शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
हजारोंचा जनसमुदाय ठिक ठिकाणी अंत्यदर्शनाकरीता प्रचंड गर्दी.
पालम : दि.03 भारतीय सीमा सुरक्षा दलातील जवान रघुनाथ मोतीराम चिमले यांच्या पार्थीवावर मंगळवारी दुपारी पालम तालुक्यातील सिरपूर या गावी हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत शोकाकूल वातावरणात, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्रिपुरा राज्या तील आगरतळा येथून सोमवारी सायंकाळी 7 वाजता चिमले यांचे पार्थीव विमानाद्वारे हैद्राबादकडे रवाना करण्यात आला. लातूर कॅम्पमधील लष्करी अधिकारी व जवानाच्या पथकाने चिमले यांचे पार्थीव ताब्यात घेवून मंगळवारी दुपारी पालममार्गे सिरपूर गाठले तेव्हा गंगाखेड ते पालम या राज्य मार्गावर ठिकठिकाणी हजारोंच्या जन समुदायाने पार्थीवावर पुष्पवृष्टी तसेच भारत माता की जय, वंदे मातरम् असा जयघोष करीत चिमले यांच्या पार्थीवाचे अंत्यदर्शन घेतले. सिरपूर या गावी पार्थीव दाखल झाल्याबरोबर कुटूंबियां सह ग्रामस्थांच्या भावना अनावर झाल्या. चिमले यांच्या घरापासून अंत्ययात्रा निघाल्यानंतर हजारो ग्रामस्थ त्यात सहभागी झाले. ठिकठिकाणी भारतमातेचा जय घोषाने आकाशही दुमदुमले.दुपारी उशीरा महसूल, पोलिस प्रशासन तसेच भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचार्यांच्या उपस्थितीत, स्थानिक लोकप्रतिनिधी व हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत विधीवत तसेच शासकीय इतमामात चिमले यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान, चिमले हे पालम तालुक्यातील छोट्याशा सिरपूर या गावातून 2003 या साली सीमा सुरक्षा दलात दाखल झाले. जम्मू व काश्मिर, आसाम, पश्चिम बंगाल वगैर सीमावर्ती भागात त्यांनी 20 वर्षे सेवा केली. दीड-दोन वर्षांपूर्वीच आजाराने गाठल्यानंतर ते अस्वस्थ होते. आठ दिवसांपूर्वीच कर्तव्यावर असतांना प्रकृती बिघडल्याने चिमले यांना आगरताळा (त्रिपूरा) येथील सैनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.