विटी-दांडू खेळाने उजळल्या बालपणीच्या आठवणी
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : येथील लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आजी-आजोबा दिवस विविध कार्यक्रमांनी नुकताच साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन करून ज्येष्ठ आजोबा गुणवंत भुसारी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन सरपटवार, उपप्राचार्य रुपचंद धारणे, पर्यवेक्षक प्रफुल्ल वटे उपस्थित होते. सर्वप्रथम आजोबांसाठी विटी-दांडू हा खेळ घेण्यात आला. त्यात शिक्षक आणि आजीवर्ग सुद्धा सहभागी झाला होता. यावेळी दांडुचा विटीला तडाखा हाणताना आजोबांना आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. तर उपस्थित आजींनी संगीत खुर्ची खेळात सहभागी होऊन मनसोक्त आनंद लुटला. यावेळी आजींसाठी उखाणे स्पर्धा घेण्यात आली.त्यात सर्व आजींनी उखाणे सादर केले. तसेच भजने व इतर गाणीही गायिली. यावेळी आजी-आजोबांच्या मनोरंजनासाठी विद्यार्थ्यांनी नृत्य व गीत सादर केले. संगीत खुर्ची खेळात विजेत्या ठरलेल्या आजी विमल आसूटकर यांचा यावेळी प्राचार्य सचिन सरपटवार यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर विटी-दांडू खेळात विजेते ठरलेले आजोबा गुणवंत भुसारी यांचाही उपप्राचार्य रुपचंद धारणे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वर्ग सहावीच्या विद्यार्थी मयूर बाटे याने आजोबाची केलेली वेशभूषा आणि विद्यार्थीनी हृदयी कटलावार हीने केलेली आजीची वेशभूषा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन शिक्षिका प्राजक्ता चिखलीकर यांनी केले. तर आभार शिक्षिका शुभांगी उराडे यांनी मानले.