महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : पोळ्यासाठी गावी आलेल्या एका युवकाने भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा गावाजवळून वाहत असलेल्या इर ई नदी पात्रात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.प्राप्त माहितीनुसार भद्रावती तालुक्यातील काटवल (तु.) येथील युवक अक्षय खापने (२५) हा चंद्रपूर येथील औष्णिक विद्युत केंद्रात नोकरीवर होता. पोळ्यासाठी तो स्वतःच्या गावी काटवल (तु.) येथे आला होता. पोळा सण साजरा झाल्यानंतर तो शनिवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान मोटारसायकलने काटवल येथून चंदनखेडा येथे आला. त्यानंतर चंदनखेडा येथून काटवलला परत जात असताना इरई नदी पुलाजवळ आपली मोटारसायकल थांबवली. त्यानंतर त्याने नदीत उडी घेतली. या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी देण्यात आली. तसेच भद्रावती पोलिसांना कळविण्यात आले. त्यानुसार भद्रावती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बिपीन इंगळे आपल्या ताफ्यासह घटना स्थळी दाखल झाले. चंद्रपूरवरुन बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. बचाव पथकाने दिवसभर अक्षयचा नावेद्वारे शोध घेतला. परंतु अक्षयचा मृतदेह हाती लागला नाही. अखेर अंधार पडल्याने बचाव पथकाला आपली शोध मोहीम थांबवावी लागली.आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पोलिस पुढील तपास करीत आहेत.