महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : अनेक तक्रारीनंतर वीज वितरण कंपनीतर्फे मांगली शेत शिवारात तब्बल 15 दिवसांनी खराब झालेल्या ट्रान्सफरच्या ठिकाणी नवे ट्रान्सफॉर्मर लावण्यात आल्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत होऊन आता धानपिक वाचवता येईल अशी आशा मांगली शिवारातील शेतकऱ्यांना होती. मात्र कसले काय ,नव्यानेच लावण्यात आलेले ट्रान्सफॉर्मही केवळ एका दिवसातच खराब झाले आणि येथील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले.
आता विद्युत पुरवठा बंद पडल्याने या भागातील शेतकऱ्यांची लाखो रुपयांचे धानपिक नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. मांगली येथील शेत शिवारातील सुनील पतरंगे यांच्या शेता जवळील विद्युत ट्रान्सफॉर्मर खराब झाल्याने या भागातील विद्युत पुरवठा बंद पडला. याची तक्रार वीज वितरण कंपनीकडे केल्यानंतर भद्रावती कार्यालयामार्फत याचा आवश्यक तो रिपोर्ट वरोरा उपविभागाकडे पाठविण्यात आला. मात्र वरोरा उपविभागात ट्रान्सफॉर्मरच उपलब्ध नव्हते. वेळोवेळी संपर्क साधल्यानंतर पंधरा दिवसानंतर कसेबसे ट्रान्सफॉर्मर पाठविण्यात आले व ते लावण्यात आले. मात्र नवे ट्रांसफार्मरही सदोष असल्यामुळे लावल्यानंतर ते एकाच दिवसात खराब झाल्याने विद्युत पुरवठा परत एकदा बंद पडला. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून तालुक्यात पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे धानपिक वाळण्याच्या स्थितीत आहे. कृषी पंपा द्वारे पाणीपुरवठा करून धानपीक वाचवता येत होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून या भागातील विद्युत पुरवठा बंद पडलेला असल्यामुळे शेतकऱ्यांचा तोही उपाय बंद झाला आहे. या एक-दोन दिवसात पिकांना पाणी न मिळाल्यास हजारो रुपये खर्च करून रोवणे केलेले धानपीक नष्ट होण्याची चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या या गंभीर समस्येकडे विज वितरण कंपणी त्वरीत लक्ष देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करुन येथील शेतकऱ्यांना न्याय देईल काय हा सवाल येथील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.


