महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : विद्यार्थ्यांना डॉक्टर बना, इंजिनिअर बना म्हणून सर्वच सांगतात, मात्र माणूस बना असे कोणीच सांगत नाही अशी खंत वर्धा येथील फिनिक्स अकादमीचे संचालक प्रा. नितेश कराळे यांनी व्यक्त
केली. ते येथील राया संस्थेतर्फे येथील राजवंदन सभागृहात आयोजित पालक व विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कायदेविषयक सल्लागार ॲड.जयसिंह चव्हाण होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आ.प्रतिभाईताई धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, तहसीलदार अनिकेत सोनवणे, संवर्ग विकास अधिकारी आशुतोष सपकाळ आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.आ.प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रा.कराळे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आय.ए.एस., आय.पी.एस., आय.एफ.एस. सारख्या परीक्षांची तयारी करावी.त्यासाठी जिद्दीने अभ्यास करावा. यश हमखास मिळते. पालकांनी आपल्या मुलांना वर्तमान पत्र वाचायची सवय लावावी. आजची पिढी व्यसनाधीन झालेली दिसून येते. हे योग्य नाही. कमी जगा, पण चांगले जगा असा मोलाचा सल्लाही प्रा.कराळे यांनी विद्यार्थ्यांना दिला. स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर मन लावून करा. त्यासाठी परिश्रम करण्याची तयारी ठेवा.नाही तर वडिलांचा पैसा वाया घालवू नका असाही सल्ला प्रा.कराळे यांनी यावेळी दिला. यावेळी आ.धानोरकर यांनी प्रा.कराळे यांच्या मार्गदर्शनातून अनेक अधिकारी निर्माण झाल्याचे सांगत त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.तर नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी नगर पालिकेतर्फे शहरातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याकरिता हुतात्मा स्मारक येथे वाचनालय सुरू केले असून अत्यंत अल्प दरात स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून दिलेली आहेत. या सुविधेचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही अनिल धानोरकर यांनी यावेळी केले.यावेळी प्रा.कराळे यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले व बरोबर उत्तर देणाऱ्यास पुस्तक बक्षीस दिले. कार्यक्रमाला विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते.


