सईद कुरेशी
शहर प्रतिनिधी, नंदुरबार
नवापूर तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात हत्तीरोगाची समस्या असल्याने तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन औषधोपचार करणार असल्याचे, जिल्हा हिवताप अधिकारी अधिकारी अपर्णा पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.नवापूर तालुक्यात ग्रामीण व शहरी भागात ही मोहिम सुरु झाली असून 26 ऑगस्ट 2023 पर्यंत ही मोहिम सुरु राहणार आहे. यामध्ये घरोघरी जावून आरोग्य कर्मचारी गोळ्या खाऊ घालणार आहेत. हत्तीरोगाच्या निर्मुलनासाठी सामुहिक औषधोपचार मोहिम आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या मोहिमेत नवापुर तालुक्यातील 2 वर्षाखालील मुले, गर्भवती स्त्रिया व गंभीर आजारी रुग्ण वगळता सर्वांना गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहेत. शहरी व ग्रामीण भागात शाळा, बसस्थानक, रेल्वेस्थानक येथे बुथ आयोजित करण्यात येतील व सर्व कार्यालये, बँका व इतरत्र घरोघरी जाऊन गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहेत.हत्तीरोग हा बुचेरेरीया बॅनक्रॉफटी या परोपजीवी जंतुमुळे होणारा आजार असुन या आजाराचा प्रसार क्युलेक्स प्रकारच्या डासांमुळे होतो. दुषित व्यक्तिच्या शरीरातील हत्तीरोगाचे जंतु या डासामार्फत निरोगी व्यक्तिच्या शरीरात प्रवेश करतात. नवापुर तालुक्यातील सर्व नागरिकांना एकाच वेळी डी.ई.सी. व अलबेन्डाझॉल गोळ्या खाऊ घातल्यामुळे दुषित आणि वाहक व्यक्तिंच्या शरीरातील हत्तीरोगाचे जंतु मरतात व त्यामुळे निरोगी लोकांना हत्तीरोग होण्याचा धोका टळतो. यासाठी नवापुर तालुक्यातील प्रत्येक पात्र व्यक्तिने आरोग्य विभागाने दिलेल्या गोळ्या खाणे आवश्यक आहे.
आरोग्य विभागामार्फत या मोहिमेसाठीचा पुरेसा औषधसाठा, प्रशिक्षण देण्यात आले आहे. शाळांमध्ये जाऊन सदर मोहिमेबाबत जनजागृती करण्यात येत आहे, शहर परिसरात होर्डींग, बॅनर, घंटागाडीद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. नवापुर तालुक्यातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याने या गोळ्यांचे सेवन करणे आवश्यक असल्याने 17 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये नवापुर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या हत्तीरोग सामुदायीक औषधोपचार मोहिमेमध्ये सर्व नागरिकांनी सहभाग घेऊन, गोळ्यांचे सेवन करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे, व जिल्हा हिवताप अधिकारी श्रीमती अपर्णा पाटील यांनी केले आहे.