डॉ. शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी, परभणी.
परभणी: दि.18 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या परभणी जिल्हा शाखेच्या वतीने रविवारी (दि.20) रोजी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले असून रविवारी सकाळी निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात येणार आहे. निर्भय मॉर्निंग वॉक काढून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडले, सूत्रधार कधी पकडणार? याबाबत शासनाला विचारणा केली जाणार आहे. ही रॅली सकाळी 6 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथून निघून राजगोपालाचारी उद्यान येथे रॅलीचा समारोप होईल. या रॅलीत समविचारी संघटना सहभागी होणार आहेत. तसेच डॉ.दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. यात रक्तदान शिबिराचे आयोजन दुपारी 11 वाजता डॉ. मानवतकर चेस्ट हॉस्पिटल गव्हाणे रोड, परभणी येथे केले आहे. तसेच डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या दहा पुस्तकांचे विमोचन कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते मानवतकर चेस्ट हॉस्पिटल येथे दुपारी 12 वाजता करण्यात येणार आहे.
तसेच सायंकाळी 7 वाजता वैज्ञानिक दृष्टीकोनावर सप्रयोग व्याख्यान आंबेटाकळी येथे होणार आहे. या कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, परभणीच्या वतीने करण्यात आले आहे.


