महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती,दि.१३:-मानवाच्या निरामय आहारासाठी निसर्गाने अनेक रानभाज्यांची उपजत निर्मिती केली असून या रानभाज्यांचे आपले महत्त्वाचे गुणधर्म आहे. त्यामुळे मानवाने आपल्या आहारात प्रत्येक हंगामात निघणाऱ्या विविध रानभाज्यांचा समावेश करून निरामय आयुष्यासाठी या भाज्यांचे सेवन केले पाहिजे असे प्रतिपादन आ.प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. येथील नगर परिषदेच्या जवळ असलेल्या सेवादल मैदानावर दि.१२ ऑगस्ट रोजी रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी त्या उद्घाटनपर भाषणात बोलत होत्या. यावेळी आमदार प्रतिभाताई धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, माजी सभापती प्रवीण ठेंगणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम.तोटावार, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे,वरोरा उपविभागीय कृषी अधिकारी सुशांत लव्हटे, तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव, कृषी अधिकारी यु.बी.झाडे, चंदनखेडा मंडळ कृषी अधिकारी व्ही.जे.चवले, दत्तात्रय गुंडावार, सूरज गावंडे, मल्टी टास्किंग ग्रेडर पी.एम.ठेंगणे, कृषी पर्यवेक्षक व्ही.बी.कवाडे, पांडुरंग सरवदे, सौ.एम.एन.ताजने, कु.एच.एल.इद्दे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सुधीर हिवसे आदी मान्यवर उपस्थित
होते.जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून दि.९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत भद्रावती तालुक्यात रानभाजी महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सेवादल मैदानावर सदर रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
निसर्गाने प्रत्येक हंगामात विशिष्ट प्रकारच्या रानभाज्यांची निर्मिती केली आहे.या रानभाज्या त्या त्या हंगामात आरोग्यासाठी लाभदायक असतात. त्यामुळे आजच्या पिढीने या रानभाज्यांची व त्यांच्या गुणधर्मांची माहिती जाणून घेऊन या रानभाज्या आपल्या आहारात समाविष्ट कराव्यात, असे आवाहन यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले. सदर रानभाजी महोत्सवात तरोटा, पात्रू, गोफीन, रानधोपा, धानभाजी, वेळूचे कोंब, काटवल आदी रानभाज्यांचे स्टाॅल्स लावून त्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी रानभाज्यांमध्ये असलेल्या आरोग्यदायी गुणधर्मांची माहिती देण्यात आली. या रानभाजी महोत्सवात तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक,आत्मा, उमेद अंतर्गत गटातील शेतकरी बंधू-भगिनी यांनी भाग घेऊन रानभाजी नमुने प्रदर्शनी ठेवून रानभाजी विक्री करण्यात आली. उपस्थितांना रानभाजीचे प्रकार, उपयोग, पाककृती बाबत मार्गदर्शन करण्यात आले. महोत्सवात शहरातील नागरिक, तालुक्यातील शेतकरी तथा गावकरी सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव यांनी केले. संचालन मुधोली कृषी सहाय्यक अनिल भोई यांनी केले. आभार चंदनखेडा मंडळ कृषी अधिकारी व्ही.जे.चवले यांनी मानले.रानभाजी महोत्सव यशस्वी करण्याकरिता सर्व कृषी सहाय्यक व शेतकरी मित्र यांनी परिश्रम घेतले.


