किरण नांदे
शहर प्रतिनिधी ठाणे
ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे एकच रात्री १७ जणांनी आयुष्य गमावले. मृत्यू झालेल्या १७ पैकी १३ रुग्ण हे आयसीयूमधील तर ४ रुग्ण जनरल वॉर्डमधील होते. तीनच दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अनागोंदी कारभार समोर आला होता. वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णालयातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली. यामध्ये एका रुग्णाचा हृदयविकाराच्या झटक्याने, उलटी झाल्याने एका रुग्णाचा, एक अज्ञात आणि एकाला पायाला गळू झाला होता तर एका गरोदर मातेचा मृत्यू झाला होता.