डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी, परभणी
परभणी,दि.08 : तालुक्यासह जिल्ह्यात रासायनिक खते किंवा बोगस बि-बियाणां संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यास प्रशासनाद्वारे तातडीने हालचाली करीत संबधितावर कठोर कारवाई केली जाईल यात कोणतीही हयगय केली जाणार नाही असा विश्वास जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी व्यक्त केला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून जिल्हाधिकारी गावडे यांनी जिल्ह्यात सध्या रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आलेला असून गेल्या काही दिवसांत बोगस बियाणांच्या 3 तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्यांचे अहवाल आल्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. अशा तक्रारी आल्या की घटनास्थळी भेट व पंचनामा करून प्रसंगी कायदेशीर कार्यवाहीच्या सुचना कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. सद्यस्थितीत जिल्ह्यात आरसीएफ कंपनीचा 2600 मे.टन युरिया प्राप्त झाला असून अद्यापही पुरवठा चालू आहे. त्यामुळे खतांचा कुठलाही तुटवडा निर्माण होणार नाही. युरिया, डीएफबी, एमओपी, एनपीके, एसएसपी, सल्फेट आदी बियाणे मागणी प्रमाणे उपलब्ध होत आहेत, असे ते म्हणाले.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.











