सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात पडलेले दिसत आहेत. गत वर्षात महाराष्ट्रातील राजकारणात मोठमोठ्या घटना घडताना दिसत आहेत. या घटनांमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले आहे. शिवसेना पक्षात झालेली फुट आणि यातून निर्माण झालेले दोन गट यामुळे राज्यातील राजकारणात मोठे बदल झाले. शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ असलेले आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेना पक्षात ठाकरे गट आणि शिंदे गट असे विभाजन झाले. या बंडखोरीमुळे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद मिळाले मात्र शिवसेनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धांदल उडाली नेमके कोणासोबत जावे हा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्याला पडला एवढे वर्षे झाली ज्या पक्षासोबत एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांची कोंडी झालेली दिसून आली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती आणि या घटनेची पुनरावृत्ती पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांच्या बंडखोरीच्या माध्यमातून पहायला मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीमुळे त्यांनांही भाजपाकडून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री पद मिळाले परंतु या घटनेमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मोठा झटका बसला तर महाराष्ट्रातील सामान्य जनता आजही या दोन घटनांमुळे संभ्रमात पडलेली दिसते. महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या घडामोडींमुळे राजकीय पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कोंडी झाली आहे. परंतू नेमके आपण कोणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न निर्माण झाला आहे. २०२४ लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात होत असलेले बदल पहाता पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संभ्रमात पडलेले दिसतात. कारण काल पर्यंत सकाळी शिवसेनेचे झेंडे घेऊन फिरणारे दुपारी दुसऱ्याच पक्षाच्या गाडीतून फिरताना दिसत आहेत. आणि दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे घेऊन मिरवणारे रात्रीतूनच तिसऱ्या पक्षाच्या गाडीत बसून फिरताना दिसत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यातील राजकीय पक्षाचे सामान्य जनतेला प्रश्न पडला आहे की नेमके मतदान कोणाला करावे. तर सामान्य कार्यकर्ते म्हणत आहेत विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती.