भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी शेवगाव
शेवगाव : पाऊस लांबल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या खोळाबल्या आहेत,आव्हाणे परिसरातील शेतकरीराजाचे डोळे निळ्या आभाळाकडे लागले आहेत.मागील वर्षी जून महिण्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये दमदार स्वरूपाचा पाऊस पडल्याने बळीराजाने कपाशी, बाजरी, मूग, उडीद, तूर, भुईमूग आदीची पेरणी केली होती. परंतु यंदा जून महिन्यचा पंधरावाडा उलटूनही वरुणराजाने हजेरी न लावल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल तसेच निराश झाला आहे. एप्रिल – मे महिन्यात शेतकऱ्यानी शेतीची मशागत करून ठेवली आहे. मात्र पाऊस यंदा नसल्याने पेरण्या राहिल्या आहेत. खते -बियाणे खरेदीसाठी बँका तसेच सोसायटी,पतसंस्था मध्ये शेतकऱ्यांनी सोने गहाण ठेवले असून परंतु पावसाने मात्र पाठ फिरवल्याने शेतकरीवर्गामध्ये चितेत वाढ झाली आहे.तसेच मागील वर्षीचा कापूस अजून तसाच घरामध्ये भाववाढीच्या आशेवर पडून असून त्यात यंदाही पावसाने दांडी मारल्याने शेतकरी त्रस्त आहेत.त्यामुळे संपूर्ण वर्षभराचे आर्थिक नियोजन मात्र बिघडणार आहे.
खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकरी बांधवांची पुर्वतयारी झालेली आहे.परंतु पावसाअभावी जिरायती क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. तरी शेतकरी बांधवांना विनंती आहे कि पेरणीयोग्य पूर्ण ओल झाल्याशिवाय जिरायती शेतकऱ्यांनी पिकांची लागवड करू नये. अर्धवट ओलीवर लागवड केल्यास बियाणे उगवण कमी होऊन त्यातून नुकसान होण्याची शक्यता असते. – श्री. कुंढारे साहेब, साहायक कृषी अधिकारी आव्हाणे बु.


