पिंपरी : चिंचवड देवस्थानाला 500 वर्षे पूर्ण होत आले आहेत. पण, इतक्या मोठ्या देवस्थानाला अद्याप ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचाही दर्जा मिळाला नाही. याचे मला आश्चर्य वाटते. दर्जा देण्यासाठी कोणतीही कागदपत्रे पूर्ण करावी लागत नाहीत. त्यासाठी तत्काळ चिंचवड देवस्थानाला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच ‘क’ वर्ग म्हणून यावर्षी जो निधी मिळेल, तो लगेच देतो. त्यानंतर ‘ब’ आणि ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले. चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाचे पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते शनिवारी (दि. 10) उद्घाटन झाले. याप्रसंगी खा. श्रीरंग बारणे, आ. महेश लांडगे, आ. उमा खापरे, माजी महापौर उषा ढोरे, भाजपचे चिंचवड निवडणूक प्रभारी शंकर जगताप, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, धर्मदाय सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त जितेंद्र देव, हभप आनंद तांबे, अॅड. राजेंद्र उमाप, विनोद पवार तसेच अश्विनी जगताप, माजी नगरसेविका उषा मुंडे, अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक एकनाथ पवार, नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, धार्मिक संस्थानाला बळकटी दिली पाहिजे. ‘चिंचवड देवस्थानाला छत्रपती शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, राजर्षी शाहू महाराज, श्रीमंत बाजीराव पेशवे अशा अनेकांनी त्या-त्यावेळेला खूप मदत केली. खा. श्रीरंग बारणे म्हणाले, ‘गणपतीला आपण विघ्नहर्ता म्हणतो. सध्या समाजामध्ये जे चालले आहे. त्या वाईट प्रवृत्तींना गणरायाने चांगली बुद्धी द्यावी’. आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवडची भूमी संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. देवस्थान ट्रस्ट अतिशय चांगले काम करत आहे. प्रास्ताविक विश्वस्त विनोद पवार यांनी केले. विश्वस्त जितेंद्र देव यांनी दिनदर्शिकेची माहिती दिली. विश्वस्त आनंद तांबे यांनी आभार मानले. चंद्रकांत पाटील म्हणाले की, माझ्यावर हल्ला करताना त्यांना वाटले की घाबरेन, गर्भगळीत होईल, कुठेतरी लपून बसेन; पण मी शर्ट बदलला आणि कार्यक्रमात आलो. ही ताकद मला माझ्या साधनेने मिळाली.