पुणे : असं म्हटलं जातं ‘युद्धात जिंकलो आणि तहात हरलो’ ही वेळ कर्नाटक विषयावर पंतप्रधानासोबत चर्चा करताना होऊ नये. म्हणून मुख्यमंत्र्यांनी गनिमी कावा वापरून त्यांची हुशारी व चातुर्य दाखवत राज्याच्या भल्यासाठी कमी पडलो नाही हे दाखवून द्यावे. नाहीतर समृद्धीच्या पाहणी दौऱ्यात स्टेरिंग उपमुख्यमंत्र्याच्या हाती, असे पंतप्रधानांसोबतच्या बैठकीतही होता कामा नये असा उपरोधिक टोला विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुण्यात लगावला. पुण्यात रविवारी सकाळी आठ वाजता झालेल्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मराठवाडा विदर्भ व मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे खऱ्या अर्थाने विकास होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान येत असून माझे पत्रिकेत नाव नसले तरी मला निमंत्रण मिळालेले आहे. वास्तविक पाहता एक मे रोजीच या महामार्गचे लोकार्पण होणार होते. मात्र एका पुलावर दुर्घटना घडली अन् कार्यक्रम लांबला.
या महामार्गाच्या पाहणी दौऱ्या दरम्यान एक वेगळे चित्र पाहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. विशेष म्हणजे त्यांच्या गाडीची स्पीडही १५० ची होती. यासह अनेक बाबी दिसून आल्या, त्याचा समाचार आम्ही घेणार आहोतच. तरीही यामागचे गमक काय, काय अर्थ होता हे राजकीय दृष्टीने पाहणे आवश्यक असल्याचं पवार यांनी सांगितले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेली शाईफेक घटना घडायला नको होती. मतभेद अन् विचारांची लढाई असू शकते. त्यासाठी निषेध व्यक्त करण्याची अनेक मार्ग आहेत. थोर पुरुषांबद्दल बोलताना राज्यकर्त्यांनी देखील भान ठेवणे गरजेचे आहे. वारंवार असंच घडणार असेल तर महाराष्ट्रातील जनता काय आम्हीही खपवून घेणार नाही. राज्यपालांवरील कारवाई व अन्य विषयासंदर्भात आघाडीचा १७ डिसेंबर रोजी मोर्चा तर पुण्यात १३ डिसेंबर रोजी बंद पुकारलेला आहे असेही पवार यांनी सांगितले.
कर्नाटक सीमा प्रश्नावरून पेटलेले रान भिजवण्याचे काम थेट आता पंतप्रधानांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत केले जाणार आहे. राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांनी शिकवलेल्या गनिमी काव्याचा वापर करावा अन् महाराष्ट्रातील जनतेला दाखवून द्यावे की, आपण कुठेच कमी पडू शकत नाही. बैठकीत सीएम की डीसीएम बाजू मांडतील त्यांनी आपण कसे योग्य आहोत हे दाखवून देत हक्क मिळवून द्यावा असेही त्यांनी सांगितले. मंत्री 20 असले तरी चाळीस मंत्र्यांच्या नावे बंगले बुक करण्यामागचे गुपित म्हणजे याच काळात मंत्रिमंडळ विस्तार प्लॅन असू शकतो अशीही शंका पवार यांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे नीती आयोगासारखे पद निर्मिती महाराष्ट्रात करण्यात आली असून त्याजागेवर एका बिल्डरची नेमणूक करण्यात आली आहे. त्याच बिल्डर विषयी मागेच आशिष शेलार यांनी आक्षेप घेतलेला असताना सीएम डीसीएम काहीतरी चाललंय अस दिसते, या प्रश्नावर बोलताना पवार यांनी गुगली टाकत सांगितले की, ‘ त्या दोघांचं ते चाललंय त्या दोघांना लखलख लाभ ‘ अस म्हणत त्यांनी काढता पाय घेतला.


