नाशिक : म्हसरुळच्या मानेनगर येथील द किंग फाउंडेशन ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रमाचा संस्थाचालक हर्षल बाळकृष्ण मोरे याने आणखी सात मुलींवर अत्याचार केल्याचे पोलिस तपासात समोर आले. यातील ५ मुली आश्रमातील असून सटाणा येथील त्याच्या राहत्या घरी शिक्षणासाठी ठेवलेल्या २ मुलींवरही त्याने अत्याचार केला. पोक्सो कायद्यांतर्गत त्याच्यावर ५ गुन्हे दाखल केले. आधार आश्रमातील पत्र्याच्या खोलीत रात्री बोलावून मोरेने आदिवासी अल्पवयीन मुलीला हातपाय दाबून देण्यास सांगितले. त्यानंतर पॉर्न फिल्म दाखवून ‘तू माझे काम केले नाही तर तुला होस्टेलमधून काढून टाकेल’ अशी धमकी देत अत्याचार केला. त्यानंतर पोलिसांनी आश्रमातील १३ मुलींकडे चौकशी केल्यानंतर यातील ५ व सटाण्यातील राहत्या घरी शिक्षणासाठी ठेवलेल्या २ मुलींवर अत्याचार केला. दहा वर्षांपासून शोषण होत असल्याची मुलींची माहिती आश्रमाची इमारत भाडेकरारावर घेतली आहे. मालक मुंबई येथील रहिवासी आहे. इमारत मालकाला जबाबासाठी बोलावण्यात आले आहे. संशयित मोरेची सासू आश्रमात मुलींची व्यवस्था सांभाळते. त्याची पत्नी मालेगाव येथे वास्तव्यास आहे. पोलिसांकडून सासूची व मदतनीस महिलेची चौकशी केल्यानंतर संशयिताकडून गेल्या १० वर्षांपासून आश्रमातील अनेक मुलींचे शोषण सुरू असल्याची धक्कादायक माहिती महिलांनी दिली.