पुणे : पुण्यात ओला, उबेर आणि रेपीडो यांच्या बाईक-टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांनी संप पुकारला आहे. तब्बल 12 संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. शहरात बेकायदेशीररित्या सुरू असलेली बाईक-टॅक्सी सेवा पूर्णपणे बंद करण्याची मागणी रिक्षा चलकांची आहे. रिक्षा चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएल प्रशासनाने तब्बल 100 जादा बस सोडल्या असून एकूण 1700 बस सोमवारी पुणे आणि पिंपरीत धावत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बाईक टॅक्सी मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. याचा फटका इतर रिक्षाचालकांना बसतो. या बाईक टॅक्सीमुळे भाडे मिळणे कठीण होते. याचा परिणाम त्यांच्या कमाईवर होतो. पुण्यात सुरू असलेली बाईक टॅक्सी बंद करण्यात यावी अशी मागणी या पूर्वीही करण्यात आली होती. या साठी आंदोलन देखील करण्यात आले होते. मात्र, त्याचा प्रशासनावर काही परिणाम न झाल्याने रिक्षा चालक संघटनांनी एकत्र येत आक्रमक पवित्रा घेतला आहे. या संपात एकूण 12 रिक्षाचालक संघटना सहभागी होणार आहेत. मात्र, बाबा आढाव यांची संघटना या संपात सहभागी होणार नाही.
या संदर्भात रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे म्हणाले, बाइक टॅक्सीमुळे रिक्षा चालकांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. ही सेवा बंद करण्याची मागणी आम्ही केली होती. मात्र, त्याचा काहीही परिणाम न झाल्याने आम्ही आजपासून आरटीओ कार्यालयासमोर उपोषणाला बसत आहे. आरटीओ प्रशासन व वाहतूक पोलिस बाईक टॅक्सीविरोधात जुजबी कारवाई करीत आहे. प्रवासी सेवा देणाऱ्या कंपनीच्या ॲपमधून बाईक टॅक्सीचा पर्याय काढून टाकावा अशी आमची मागणी असून रिक्षा संघटनेने आपल्यातले मतभेद बाजूला ठेवून रिक्षा चालकांच्या हितासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. ज्या संघटना अजूनही आंदोलनामध्ये सहभागी झाल्या नाहीत, त्यांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कांबळे यांनी केले आहे. या संपात पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील तब्बल 50 ते 60 हजार रिक्षाचालक सहभागी होणार असून सोमवारी पासून सकाळी दहा वाजल्यापासून संपला सुरुवात झाली आहे. पुणे महानगर पालिकेच्या पीएमपीएमपीएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रेय झेंडे म्हणाले, संपाच्या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने जास्तीच्या बस रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 1700 बस प्रवाशांच्या सेवेत धावतील. नेहमीच्या तुलनेत सुमारे 100 बस जास्तीच्या सोडल्या जात आहे. ग्रामीण भागातील फेऱ्याची संख्या कमी करून त्या बस शहरात विविध मार्गावर सोडणार आहेत.