पुणे : स्वत:च्या कार्यालयात नोकरीस असलेल्या महिलेला पेस्ट्रीमध्ये गुंगीचे औषध टाकून महिलेला देत तिच्यावर सीएने अत्याचार केला. त्यानंतर अत्याचाराचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तीन वर्षे ब्लॅकमेलिंग केली व सातत्याने अत्याचार केला. या प्रकरणी सीएला येरवडा पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी अनिरूद्ध सतीश शेठ (वय 42, रा. डहाणूकर कॉलनी, कोथरूड) याला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मार्च 2019 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत झाल्याचे समोर आले आहे. याबाबत 50 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. येरवडा पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी महिलेच्या पहिल्या पतीचे 2010 मध्ये निधन झाल्यानंतर त्या महिलेचे 2012 मध्ये दुसरे लग्न झाले. फिर्यादी महिलेचा दुसरा पती आणि आरोपी अनिरुद्ध शेठ एकाच अपार्टमेंटमध्ये राहायला होते. त्यावेळी त्यांचे कौटुंबिक संबंध चांगले होते. कालांतराने दुसऱ्या पती व सासू त्रास देत होते त्यावेळी अनिरुद्ध शेठ फिर्यादी महिलेला सहानुभूती दाखवत असे. त्यानंतर अनिरुद्ध ने त्याच्याच ऑफिसमध्ये फिर्यादी महिलेला नोकरी दिली. नोकरीच्या निमित्ताने दररोज भेट व्हायची.
क्लायंटकडे मीटिंग करण्याच्या बहाण्याने अनिरुद्ध फिर्यादी महिलेला घेऊन जात असे. दरम्यान, 22 मार्च 2019 रोजी क्लायंटला फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने अनिरुद्धने फिर्यादी महिलेस नेले व त्याठिकाणी गेल्यावर आपला वाढदिवस असल्याचे सांगत गुंगीचे औषध टाकलेली पेस्ट्री खायला दिली. त्यामुळे फिर्यादी महिलेस काही वेळात गुंगी आली. यावेळी अनिरुद्ध ने तिच्यावर अत्याचार करुन व्हिडिओ रेकॉर्ड केला. आरोपी अनिरुद्ध शेठ ने फिर्यादी महिलेस रेकॉर्ड केलेला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पुणे, मुंबई, आलिबाग या ठिकाणी वारंवार अत्याचार केला. या प्रकारास विरोध केल्यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेस व तिच्या मुलीस जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकारामुळे फिर्यादी महिला नैराश्येमध्ये गेली. त्यांनी हा सर्व प्रकार अखेर मुलीला सांगितला आणि मुलीने पोलिसांमध्ये तक्रार दिली. त्यानंतर त्यांनी येरवडा पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी अनिरुद्ध शेठ यास भारतीय दंड संहिता कलम 376, 376(2), 377, 328, 504 व 506 कलमांखाली कारवाई करीत अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.