जालना : गळ्यावर चाकूने वार करून एका मुलीची हत्या केल्याची घटना जालना शहरातील चौधरी नगर परिसरात सोमवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. ईश्वरी रमेश भोसले (8) असे त्या मयत मुलीचे नाव आहे. घनसावंगी तालुक्यातील गुंज येथील ईश्वरी रमेश भोसले (8) ही मुलगी इयत्ता दुसरीच्या वर्गामध्ये खरपुडी रोडवरील एका इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. ईश्वरीचे आई, वडील शेतकरी असून त्यांनी तिला शिक्षणासाठी जालना येथे चौधरीनगरात राहणाऱ्या काकांकडे शिक्षणासाठी ठेवले होते. ईश्वरीच्या काकाची रक्तलघवी तपासणी लॅब घनसावंगी तालुक्यात असल्याने दररोज ते जालना येथून येणे-जाणे करतात. सकाळी 9 वाजेच्या सुमारास ईश्वरी ही काकांच्या घरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. तिच्या गळ्यावर, हातावर धारदार शस्त्राचे वार होते. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी तिला तातडीने मंठा चौकातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. ईश्वरी आणि तिच्या काकांची तेरा वर्षांची मुलगी यांच्यात नेहमी भांडण होत असे, त्यातूनच तिचा खून झाल्याची चर्चा आहे.
घटनास्थळी तालुका जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश जायभाये, सहायक पोलिस निरीक्षक संभाजी वडते, सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र अंभोरे, पोलिस उपनिरीक्षक वनवे, सहायक फौजदार सय्यद, संदीप बेराड, वसंत धस, सुनील गांगे, राम शेंडीवाले, अरुण मुंडे, किशोर जाधव, टेकाळे आदींनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. घटनास्थळी पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे सुभाष भुजंग यांनीही भेट दिली आहे. हत्येचे कारण अजून समजले नाही. पोलिस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.