गजानन माळकर
तालुका प्रतिनिधी, मंठा
मंठा : तालुक्यातील तळणी पाठोपाठ दहिफळ खंदारे येथील प्रा. आ. केंद्रातही लाखों रुपयांचा ( कालबाह्य ) औषधींचा साठा रात्रीच्यावेळी नष्ट करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अपयशी ठरला असला तरी डॉक्टरसह आरोग्य सहाय्यक वेळेनुसार केंद्रात हजर राहत नसल्यामुळे रुग्णांना उपचार मिळत नसल्याचेही तक्रारी वाढल्या आहेत.दहिफळ खंदारे ( ता. मंठा ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य साहाय्यक , आरोग्य सहायिका , आरोग्य सेवक , आरोग्य सेविका, डाटा नोंदनी आपरेटर , रक्तपेढी तज्ञ , चालक व शिपाई यांची हजेरी पटावर नियुक्ती आढळून आली. मात्र, शुक्रवारी ( ता. ६ ) सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक पी बी क्षिरसागर व शिपाई एस के काकडे यांच्यासह अन्य कर्मचारी हजर होते. तर वैद्यकीय अधिकारी डॉ. पूनम मांटे व आरोग्य सहाय्यक एच एन इकडे हे ११ वाजेपर्यंत आरोग्य केंद्रात हजर नव्हते . वैद्यकीय अधिकारी डॉ. मांटे ह्या जालना येथून तर आरोग्य सहाय्यक इकडे परतुर येथुन आठवड्यात एकदाच येऊन हजेरी पटावर स्वाक्षऱ्या करीत असल्याचे उपस्थित ग्रामस्थ विजैद्र म्हस्के, श्रीकांत म्हस्के, बबन म्हस्के, संदिप म्हस्के व प्रेम सदावर्ते यांनी सांगितले.
डॉक्टरच्या प्रतिक्षेत रुग्ण बसून …
अतुल संजय राठोड ( वय १६ ) याला खोकला असल्याने सकाळी ९ वाजेपासून केंद्रात वैद्यकीय अधिका-यांची वाट पाहत असल्याचे वडील संजय राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
विभागीय आयुक्ताकडे तक्रार …
ग्रामीण भागातील गरीब रूग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार असतो. शासन लाखो रूपयांचे वेतन डॉक्टरांना देते. शिवाय महागडी औषधे पुरविते. परंतु, आरोग्य यंत्रणेला हे औषधी खराब झाली तरी फरक पडत नाही. ही स्थिती सुधारायला हवी. अश्या आशयाची तक्रार ज्ञानेश्वर राठोड यांनी ( ता. ६ ) रोजी विभागीय आयुक्त औ.बाद, जालना जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे असे सांगितले.
बातमी न देण्यासाठी पत्रकारांवर दबावतंत्र …
दहिफळ खंदारे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. पुनम मांटे यांनी पत्रकारांनी गावकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करावे , अन्यथा पत्रकारांच्या त्रासाला कंटाळून रिझाईन देईन , अशी धमकी वर्तमानपत्राच्या जिल्हा कार्यालयाकडे करत ग्रामीण पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला.