चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी,अकोट
अकोला : गेज परिवर्तनासाठी पाच वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेली अकोला ते अकोट लोह मार्गावरील पॅसेंजर गाडी अखेर बुधवार, २३ नोव्हेंबर रोजी पुन्हा सुरु झाली. या मार्गावरून आता रेल्वे धावू लागल्यामुळे अकोट परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. अशातच आता यारेल्वेवरून विविध व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडीओमध्ये अकोट स्थानकावर आलेल्या रेल्वेसमोर स्वतःचा व्हिडीओ बनविणारा तरुण दिसतो.
‘फायनली आपल्या अकोटात ट्रेनचं आगमण झालं आहे, तर आपण आता ड्रायव्हर साहेब सोबत बोलू, असे म्हणत हा युवक रेल्वे इंजिनपर्यंत जाऊन चालकाशी संवाद साधतो. हा तरुण तेवढ्यावरच थांबत नाही, ‘एखादा चक्कर आणू का रेल्वेचा’ अशी मागणी देखील करून टाकतो. हा व्हिडीओ आता सोशल- मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरीही या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ बनवणारा अकोट येथीलच तरुण युवक आहे त्याचे नाव सुशील लोणकर असे आहे.तो स्वतः व्हिडीओ एडिटर व युट्यूबर आहे.