अकोला : दिवाळी जवळ आल्याने बाजारपेठेत चैतन्यदायी वातावरण निर्माण हाेत आहे. दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. दरवर्षी वाढणाऱ्या महागाईचा परिणाम यंदाही दिवाळीच्या खरेदीवर जाणवत असला तरी, आठवड्याअखेरीस बाजारात खरेदीसाठी अधिक गर्दी होईल, असा विश्वास विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.
दिवाळीत पणत्यांना विशेष महत्त्व असते. यंदा बाजारात पणत्यांचे विविध प्रकार आले असून, त्यात पाण्यावर तरंगणारी कमळांच्या आकारातील पणत्या, हत्तीच्या पाठीवर दिवे अशा फॅन्सी पणत्यांची बाजारात चलती आहे. सेलवर चालणाऱ्या पणत्याही लक्ष वेधत आहेत. ६० रूपये डझनपासून ४०० रूपयांपर्यंत रंग, आकार, डिजाईननुसार पणत्या खरेदीसाठी आहेत. वेगवेगळ्या आकार व प्रकारांतील कंदील, लायटिंगच्या माळा दाखल झाल्या आहेत. या माळा ४० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
दिवाळी आठवड्यावर आली की, अंगणात दररोज रांगोळ्या काढल्या जातात. त्यामुळे रांगोळी काढण्यासाठी दिवाळीसाठी म्हणून आलेल्या वस्तूंनी दुकाने भरली. फूटपाथवरही विक्रेत्यांनी रांगोळी, रंग, रांगोळीची पुस्तके, रांगोळीचे छाप, उटणे विक्रीस आणल्या. संस्कारभारती रांगोळीचे रंग भरण्यासाठी नवे उपकरणही विक्रीला आलेत. दिवाळीत कपडे विक्रेत्यांचा सर्वाधिक व्यवसाय होतो. या आठवड्याच्या शेवटी खरेदीसाठी गर्दी होऊन चांगला व्यवसाय होईल, असा विश्वासही विक्रेत्यांनी व्यक्त केला.
फटाक्याच्या दुकानांची प्रतीक्षा
दिवाळीत फटक्यांची आतषबाजी केली जाते. यासाठी शहरांतील गल्लीबोळांमध्ये फटाक्यांचे स्टॉल लावले जातात. अजून शहरात व इतर भागात फटाके विक्रीची दुकाने लागलेली नाही. यंदा कोरोना निर्बंधमुक्त दिवाळी असणार आहे. त्यामुळे फटक्यांच्या खरेदीची मुलांना, युवकांना प्रतिक्षा आहे.











