समाधान पाटील
तालुका प्रतिनिधी चिखली
बुलढाणा : शिवसेनेच्या बंडखोर आमदाराच्या मतदार संघातील लोकमनाचा गोपनीय अहवाल शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावला असून, बुलढाणा विधानसभा व लोकसभा मतदारसंघातील जनमाणस उद्धव ठाकरे यांना अनुकूल असल्याचे मत या अहवालातून खात्रीशीर माहिती प्राप्त झाले असून, त्याची रणनीती आखण्यासाठी ची तयारी सुरू झाली आहे. त्यात तब्बल तीन वेळा बुलढाण्याचे माजी शिवसेना आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांना परत शिवसेनेत बोलवावे, अशी मागणी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याकडून होत असल्याची माहिती होत आहे. शिवसेना संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर त्यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दुसरीकडे, विजयराज शिंदे हे देखील मातोश्री
चे बोलावणे आले तर घरवासी करण्यास तयार आहेत, असे त्यांच्या जवळच्या नेत्याकडून कळाले असून, असे झाले तर आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध विजयराज शिंदे ही लढत पुन्हा एकदा बुलढाणा विधानसभा मतदार संघात पाहायला मिळणार आहे.यवतमाळ मध्ये मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी माजी मंत्री संजय देशमुख हे शिवबंधन हाती बांधणार असल्याचे निश्चित झाले असून, अशाच प्रकारची रणनीती बुलढाण्यात देखील आखण्यात येत आहे. बुलढाणा मतदार संघाचे तीन वेळा नेतृत्व करणारे व पाच वेळा विधानसभेची निवडणूक लढविणारे कट्टर शिवसैनिक व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये आपल्या समर्थकांसह प्रवेश केला होता. परंतु, भाजपचे राजकीय वातावरण त्यांना फारसे मानवले नाही. यातच शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर त्याच्यातील कट्टर शिवसैनिक पुन्हा जागा झाला असून, ते भाजपामध्ये अस्वस्थ असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयाचे याचे म्हणणे आहे.दुसरीकडे, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने बंडखोराच्या मतदार संघातील जनमाणसाच्या कौलाचे गोपनीय अहवाल मागविण्यात आले होते. त्यानुसार, बंडखोरांच्या मतदारसंघातील जनमाणसाचा कल जाणून घेतला गेला. या गोपनीय अहवालानुसार बुलढाणा लोकसभा व विधानसभा मतदारसंघात जनमाणस सहानुभूती बाळगून असून, शिवसेनेचा असलेला बालेकिल्ला बंडखोरीनंतर ढासळलेला नाही. त्यातच जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जालिंदर बुधवत, आशिष रहाटे यांच्यासारख्या नेत्यांनी ठाकरे गटाची धार कायम ठेवल्याने जनमाणसावर मोठा प्रभाव पडलेला आहे. यामुळे पुढील दोन वर्षात बुलढाणा विधानसभा मतदारसंघात निवडणुका झाल्या तर त्यात शिवसेनेला ( ठाकरे गट ) फायदा होऊ शकतो. त्यातच आत्ताच्या राजकीय परिस्थितीत माजी आमदार विजयराव शिंदे हे पुन्हा शिवसेनेत आलेतर, त्यांना प्रतापराव विरोधात लोकसभा नाहीतर गायकवाड विरोधात विधानसभेच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते.मातोश्री
वर झालेल्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांनीच याबाबत बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर यांना विजेराज शिंदे यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले असल्याचे मातोश्री
वरील विश्वासनीय सूत्राने सांगितले आहे.विजयराज शिंदे यांची घरवापसी करून बुलढाण्यात बंडखोर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना आव्हान देण्याची रणनीती आखली जात असल्याचे या घडामोडीतून स्पष्ट झाले आहे. तीन वर्षांपूर्वी विजयराज शिंदे हे भाजपात गेल्यानंतर, ते भाजपादेखील अडगळीत पडले होते. शिवसेना-भाजपची युती तुटल्या त्यानंतर शिवसेनाविरुद्ध भाजप अशा लढतीत ते संजय गायकवाड यांच्या विरोधात भाजपकडून लढतील अशी अटकळ होती. परंतु, आमदार संजय गायकवाड हे शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपासोबत गेल्याने विजयराज शिंदे यांची पुन्हा राजकीय कोंडी झाली. या राजकीय कोंडीतून बाहेर पडण्यासाठी ते देखील ‘ ‘ मातोश्री
च्या निमंत्रणाची वाट पाहत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय सूत्राकडून समजले आहे. त्यामुळे लवकरच विजराज शिंदे हे परत शिवसेनेत येतील असे राजकीय चिन्हे आहेत.


