कु.चंचल पितांबरवाले
शहर प्रतिनिधी,अकोट
अकोट : भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार अकोट विभागात मतदार ओळखपत्राची आधार कार्ड सोबत जोडणी करण्याचे मोहीम सुरू आहे. सदर मोहिमेत मतदार यादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहित नमुन्यात आधार क्रमांक घरोघरी जाऊन तसेच विशेष शिबिराद्वारे माहिती गोळा करण्यात येत आहे. मतदारांना त्यांचा आधार क्रमांक भरण्यासाठी नमुना अर्ज 6 ब तयार करण्यात आला असून हा अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या ecl.gov.in व मुख्य निवडणूक अधिकारी https:// ceoelection.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. मतदारांना ऑनलाइन पद्धतीने आधार क्रमांक भरण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने आधार क्रमांक भरण्याची सुविधा पोर्टल व ॲपच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
याबाबत आज अकोट नगर परिषद सभागृहात अकोट शहरातील सर्व केंद्रस्तरीय अधिकारी यांची आढावा सभा मा. उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे व अकोट नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाली. यावेळी अकोट शहरात केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या मतदान जोडणी चे कार्याचा आढावा यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी केला तसेच अकोट शहरातील मतदारांना आपले मतदार ओळखपत्र सोबत आधार जोडणी करून घ्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी यावेळी केले. सभेला अकोट शहरातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते.