अकोला : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रेरणा प्रकल्प कार्यक्रमाअंतर्गत जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त मार्गदर्शन करण्यात आले. येथील जिल्हा कारागृहातील बंद्याना वाढते आत्महत्या या विषयावर मार्गदशन व समुपदेशन कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. आर्या, तुरुंग अधिकारी डी.बी. पाटील व महेंद्र जोशी यांची उपस्थिती होती. तसेच श्रीमती यशोदा इंगळे विद्यालय व कनिष्ठ शाळा, अकोला येथील विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थांमधील निराशा, अपयशामुळे निर्माण होणारी आत्महत्यांची भावना, मोबाईल गेम्समुळे होणारा बदल, विद्यार्थांमध्ये आढळणारे मानसिक आजार इत्यादीबाबत डॉ. हर्षल चांडक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे प्राचार्य एम. व्ही. देउणकर, प्रा. प्रशांत देशमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हे कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ता अशोक जाधव व आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ता सोपान अंभारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीकरीता सय्यद आरीफ, रिना चोडंकर, कविता रिठ्ठे, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.