ज्ञानेश्वर कापसे
शहर प्रतिनिधी पुणे
पुणे : दि. १५ : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ( डीईएस ) फर्ग्युसन महाविद्यालयात परिवहन विभागातर्फे ‘ रस्ते सुरक्षा कक्षा’ची स्थापना राज्याचे अतिरिक्त परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आली . विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांची जनजागृती करण्यासाठी अशा प्रकारचा कक्ष सुरू करणारे फर्ग्युसन राज्यातील पहिले महाविद्यालय ठरले आहे . या कक्षाच्या माध्यमातून फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दुचाकी वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना मिळू शकणार आहे . रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत पुणे प्रादेशिक परिवहन विभागातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर , डीईएसचे अध्यक्ष डॉ . शरद कुंटे , प्राचार्य डॉ . रवींद्रसिंह परदेशी , अतिरिक्त आयुक्त जितेंद्र पाटील , प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ . अजित शिंदे , सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ . संजीव भोर , डॉ . राजेंद्र शर्मा , वेस्टर्न इंडिया ऑटोमोटिव्ह असोसिएशनच्या सिमरन कौर यांची प्रमुख उपस्थिती होती .पाटील म्हणाले , ” वाहन चालन परवाना मिळविणे आता सोपे झाले असले , तरी त्यासाठीची चाचणी अवघड करण्यात आली आहे . ऑनलाईन पद्धतीने वाहन चालवण्याचा परवाना देत असताना वाहन चालकाकडून नियमांचे पालन होणे अपेक्षित आहे . भारतात लोक वाहन चालविण्याचे कौशल्य दाखवायला जातात आणि अपघात होतात . परदेशात वाहतुकीचे नियम पाळले जात असल्याने अपघातांचे प्रमाण कमी आहे . रस्ते सुरक्षा संदर्भात काम करण्यासाठी महाविद्यालयात स्वतंत्र समिती असणे आवश्यक आहे.
वाडकर म्हणाले , ” छोट्या छोट्या चुकांमुळे अपघात होतात . ते टाळण्यासाठी सर्वांनीच वाहतुकीच्या नियमांचे पालन केले पाहिजे . सीटबेल्ट आणि हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक आहे . ” प्राचार्य डॉ . परदेशी यांनी प्रास्ताविक , नेहा जाधव , शिक्षा चव्हाण यांनी सूत्रसंचालन आणि शुभांगी येवले यांनी आभार प्रदर्शन केले . स्वयंसेवक विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे प्रतिक म्हणून हेल्मेटचे वाटप करण्यात आले .