गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : तेल्हारा पोलिस स्टेशनमध्ये गणेश चतुर्थीच्या शुभ पर्वावर वाजत गाजत गणरायाचे आगमन झाले होते. दहा दिवस सकाळ संध्याकाळ विधिवत पूजाअर्चा करून पोलिस अधिकारी व पोलिसांच्या वतीने श्रद्धा भाव व्यक्त करण्यात आला. आज, १२ सप्टेंबर रोजी वाजतगाजत गणरायाची मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले. गेल्या १० दिवसांपासून तेल्हारा शहरासह तालुक्यात गणपती उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात आला. गणपती उत्सव आनंदाने पार पडावा यासाठी तेल्हारा पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनाखाली तेल्हारा पोलिस प्रयत्न करीत होते. शिवाय विसर्जन मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे तेल्हारा शहरासह तालुक्यातील गणपती उत्सव व विसर्जन मिरवणुका नागरिकांच्या शांतता समितीच्या व सहकार्याने यशस्वीपणे पार पाडल्या. त्यामुळे आपले कर्तव्य पार पाहून सर्वात शेवटी पोलिसांनी तेल्हारा पोलिस स्टेशनमधील गणरायाची वाजतगाजत विसर्जन मिरवणूक काढली. देशभक्तीपर व धार्मिक गीतांच्या आवाजात निघालेल्या मिरवणुकीने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले होते. वेशभूषेतून प्रेमाचा संदेश गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा फड यांच्यासह सर्वच पोलिसांनी डोक्यावर पांढरी टोपी तसेच केशरी शर्ट व पांढरा पायजामा परिधान केला होता. त्यामुळे त्यांच्या या वेशभूषेतून शांतता व प्रेमाचा संदेश मिळत असल्याची भावना शहरवासीयांनी व्यक्त केली.


