जितेंद्र लाखोटीया
ग्रामीण प्रतिनिधी, तेल्हारा
(तेल्हारा) हिवरखेड : नुकत्याच जाहीर झालेल्या नीट परीक्षेच्या निकालात कार्ला.बु.येथील अल्प भूधारक शेतकरी बाबुराव भराटे यांची कन्या कु. राधा हिने ७२० पैकी ६३५ गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. कु.राधा हिने संपूर्ण देशातून ७७१८ वी रँक मिळवत ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा बुद्धिमत्ता व मेहनतीच्या बाबतीत शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या बरोबरीचे असल्याचे दाखवून दिले आहे. तिचे वडिल शेतकरी असून ते पिठगिरणी चालवतात. कु.राधा ही बालपणापासूनच कुशाग्र बुद्धीची असून तिचे पाचवी पर्यंतचे शिक्षण सरस्वती इंग्लिश स्कुल हिवरखेड येथे झाले असून दहावी पर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय अकोला येथे झाले आहे. तिने दहावीत ९५ % तर बारावीत सुद्धा ९४ % गुण मिळवले होते. कार्ला सारख्या छोट्याशा गावातील राधाने मिळवलेले हे फार मोठे यश असून तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून तिच्या या यशाबद्दल संत तुकाराम महाराज प्रबोधन समिती हिवरखेडने तिचे अभिनंदन केले आहे.तिने आपल्या यशाचे श्रेय आई-वडिल व गुरुजनांना दिले आहे.











