मंचर : आंबेगाव तालुक्यातील कळंब येथे जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे निदर्शनास आल्यामुळे या परिसरातील दहा किलोमीटर बाधित क्षेत्र व निगराणी म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग व भोरवाडी येथील बैलगाडा शर्यत रद्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती तहसीलदार रमा जोशी यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्राण्यांमधील संक्रमण व संसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियमानुसार मौजे कळंब (ता. आंबेगाव) येथील जनावरांच्या संसर्ग केंद्रापासून 10 किलोमीटर बाधित क्षेत्र व निगराणी घोषित करण्यात आले आहे. तसेच या गावापासून 10 किलोमीटर परिघातील क्षेत्रामध्ये बाधित व निगराणी क्षेत्रामधील मोठ्या जनावरांची खरेदी-विक्री वाहतूक, बाजार जत्रा व प्रदर्शन, बैलांच्या शर्यती आयोजित करण्यास पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंध घालण्यात आलेला आहे.त्यानुसार आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग व भोरवाडी येथे उद्या होणार्या बैलगाडा शर्यती पुढे ढकलण्यात आले आहेत. तहसीलदार रमा जोशी यांनी तसे पत्र प्रसिद्धीस दिले आहे.