अकोला : येथील विप्र युवा वाहिनी गणेशोत्सव मंडळाने कम्युनिटी टु टिबी पेशन्ट उपक्रमा अंतर्गत दहा टिबी रुग्ण एक वर्षासाठी दत्तक घेतले. या रुग्णांना वर्षभर पोषण आहार मंडळातर्फे देणार आहे. मंडळाने रुग्णांना वर्षभरासाठी दत्तक घेवून गणेश मंडळा समोर आदर्श निर्माण केला. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजना अंतर्गत २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त भारत उद्देश निश्चित केला. या अनुषंगाने विविध कार्यक्रम राबवत आहेत. मनपा अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत क्षयरोग दुरीकरणाचे काम सुरु आहे. हे उद्दीष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने सामाजातील विविध स्तरावर काम करणाऱ्या संस्था, संघटना, व्यक्ती यांच्या सोबत समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. क्षय रोगाला मुलापासून नष्ट करण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे तसेच समाजाचे योगदानही आवश्यक आहे. यासाठीच कम्युनिटी सपोर्ट टु टिबी पेशंट हा उपक्रम राबवला जात आहे.
या उपक्रमा अंतर्गत टीबी रुग्णांचे उपचार यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी उपचाराखालील रुग्णास अतिरिक्त मदत प्रदान करणे, त्यांना पोषण आहार पुरवणे असा आहे. या अनुषंगाने ३१ ऑगस्टला गणेश स्थापनेच्या शुभमुर्हुतावर नि:क्षय मित्र म्हणून विप्र युवा वाहिनी गणेश मंडळाने पुढाकार घेतला आहे. महापालिकेच्या क्षयरोग कार्यालय अंतर्गत उपचार घेत असलेले शहरी भागातील ५ आणि ग्रामीण भागातील ५ अशा एकूण १० टीबी रुग्णांना मंडळाच्या पदाधिकारी यांनी पुढील एक वर्षासाठी पोषण आहार करता दत्तक घेतले आहे. मंडळाने गणेश उत्सव साध्या पद्धतीने करुन वर्गणीचा पैसे हे क्षयरोग रुग्णांच्या पोषण आहारा करीता वापरण्याचा निर्णय घेतला आहे.