ठाणे : विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी जास्त फडफड करू नये, नाही तर आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के यांनी दिला. एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आमदारांची गद्दारी जनतेला आवडेली नाही. त्यामुळे जनता त्यांच्याकडे पाठ फिरवतेय, अशी टीका अंबादास दानवे यांनी काही दिवसांपूर्वी केली. याला नरेश मस्के यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. यासोबतच त्यांनी सामना वृत्तपत्रातून एकनाथ शिंदे सरकारवर झालेल्या टिकेलाही प्रत्युत्तर दिलंय. शिंदेसेनेतील बंडखोरांवरील दानवेंच्या टीकेवर उत्तर देताना नरेश मस्के म्हणाले, अंबादास दानवेंना विचारतं कोण? अंबादास दानवे यांनी जास्त फडफड करू नये, नाहीतर आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही… त्यांना नेतेपद मिळावं यासाठी एकनाथ शिंदेंनी किती मेहनत घेतली ते विचारा… आत्ता ठाणे आठवलं का त्यांना? जास्त बोललं तर जशास तसं उत्तर दिलं जाईल.
हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात फुले फक्त मंत्र्यांसाठी देव कोरडेच… अशी टीका सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. यावर बोलताना नरेश मस्के म्हणाले, ‘ सामनातून आमच्यावर केलेली टिका म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी…ज्यांनी कुणी हा आग्रलेख लिहीलाय त्याचे धन्यवाद देईन की त्याने हे मान्य केलं ते हिंदूत्व टिकवू शकले नाहीत…यंदाचा दसरा मेळावा हा शिंदे गटाचाच होणार आणि तोदेखील शिवाजी पार्कमध्ये होणार, असं नरेश मस्के यांनी ठणकावून सांगितलं. ते म्हणाले, ठाकरे यांना तिथे मेळावा घेण्याचा अधिकार नाहीये. हा अधिकार केवळ बाळासाहेबांचे विचार पुढे नेणाऱ्यांना आहे.. म्हणजे आम्हाला आहे…राज्यात सध्या भाजप आणि मनसे युतीची जोरदार चर्चा सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याकडे राज्याचं लक्ष आहे. यावर नरेश मस्के म्हणाले, ‘ अमित शाह येत आहेत त्याचं स्वागत, पण युतीचा निर्णय हा केवळ आमचे साहेब घेतील… काल राज ठाकरे यांच्या घरची भेट ही केवळ दर्शनासाठी घेतलेली भेट होती, त्याचा राजकिय अर्थ काढण्यात काही फायदा नाही…