पुणे : कोविडच्या संकटानंतर दोन वर्षांनंतर यंदा जल्लोषात गणेश उत्सवास सुरुवात झाली आहे. पुणे शहरासह जिल्हयात गणेश उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जात असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त सर्वत्र तैनात केला आहे. तसेच, उत्सवकाळात गुन्हेगारांवरही पोलिसांचे लक्ष असणार आहे. पुणे शहरात तीन हजार ५५६ सार्वजनिक गणेश मंडळे असून त्याकरिता साडेसात हजार पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, पुणे जिल्हयात तीन हजार ३४० सार्वजनिक गणेश उत्सव मंडळे असून ३९६ ठिकाणी एक गाव एक गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्याकरिता एकूण २६०० पोलीसांचा बंदोबस्त तैनात केला गेला आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी सांगितले की, गणेशोत्सव काळात सोशल मीडियावर पोलिसांचे लक्ष असणार आहे. इन्स्टाग्राम, व्हाॅटसअप, ट्विटर, फेसबुक आदी समाज माध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे संदेश, खोटी माहिती पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कोणीही अशी पोस्ट करणार नाही किंवा फाॅरवर्ड करणार नाही, याबाबतची जबाबदारी संबंधित पोस्ट करणारी व्यक्ती तसेच ग्रुप अॅडमिनची राहणार आहे. जिल्हयात गणेशोत्सव कालावधीत शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने मद्य विक्री करणारी दुकाने, परमीट रुम, बिअर बार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार तीन दिवस बंद ठेवण्यात आले आहे. गणेशोत्सव काळात महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ३७ (१) (३) आदेश पारित करण्यात आले आहे. जी गणेशोत्सव मंडळे ठराविक मर्यादेपेक्षा अधिकचे ध्वनी प्रदूषण करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात गणेश मंडळे त्यांच्या स्थापनेच्या ठिकाणी तसेच मिरवणुकीमध्ये ज्वालाग्रही (रॉकेल, डिझेल, पेट्रोल, गॅस इ.) पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ उत्पन्न करतात किंवा हवेत सोडतात. त्यामुळे दर्घटना होण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून कोणत्याही ज्वालाग्रही (रॉकेल, डिझेल, पेट्रोल, गॅस इ.) पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ निर्माण करण्यास किंवा हवेत सोडण्याबाबत गणेशोत्सव काळात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहे