महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : अतिवृष्टी आणि अप्पर वर्धा धरणाच्या पाण्यामुळे भद्रावती तालुक्यातील कोंढा हे गाव पूर्णपणे पाण्याखाली आल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भर पुरात गावात जाऊन मदतीचा हात दिला. कोंढा नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने कोंढावस्तीसह परिसरातील माजरी, पाटाळा, पळसगाव यांचा संपर्क तुटला आहे. याठिकाणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी भेट देऊन पुरपरिस्थितीची पाहणी केली.कोंढा गावाला चहुबाजूने पाण्याचा वेढा असल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. त्यासाठी प्रशासनाला कळवून बोट बोलाविण्यात आली. त्या बोटीत भाजपाचे कार्यकर्ते स्वतः बसले व त्यांनी कोंढावासियांना पिण्याच्या पाण्याच्या कॅन्स नेऊन दिल्या. तसेच चारगाव येथेही भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी स्वतः गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात मदत केली.पूरग्रस्त भागाच्या दौऱ्याप्रसंगी देवराव भोंगळे यांच्यासोबत जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, तालुका महामंत्री नरेन्द्र जिवतोडे, महामंत्री विजय वानखेडे, जेष्ठ नेते अफजलभाई, माजी जि. प. सदस्य रंजित सोयाम, यशवंत वाघ, भाजयुमोचे इम्रान खान, आकाश वानखेडे, तलाठी गौरकार यांच्यासह इतर उपस्थित होते.