मुंबई : गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहीहंडी, गणेशोत्सव असे मुंबई आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आली होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या उत्सवांवर अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने यावर्षी राज्यात दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. राज्य सरकारने दहीहंडी आणि गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरे करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत याबाबतची माहिती दिली आहे. गणेशोत्सव आणि दहीहंडीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज अतिशय महत्वाची बैठक झाली. गेली दोन वर्षे कोरोनामुळे सर्व सण उत्सवांवर मर्यादा होत्या. निर्बंध होते. इच्छा असूनही उत्सव साजरे करता आले नाहीत. यावर्षी मात्र सर्व मंडळांचा उत्साह आणि गेल्या दोन वर्षांतील मर्यादा पाहता यावर्षी गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्र उत्साहात साजरे झाले पाहिजेत, असा कल दिसून आला. त्यामुळे यावर्षी सर्व उत्सव निर्बंधांविना साजरे होतील. कायदा सुव्यवस्था राखून सण साजरे व्हावेत, यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. गणेशोत्सवापूर्वी सर्व मार्गांवरील खड्डे बुजवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच मंडपांच्या परवानग्या सुटसुटीत झाल्या पाहिजेत. यासाठी एक खिडकी योजना, ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुटसुटीत करण्यात आल्या आहे. गणेश मंडळांना नोंदणीसाठी शुल्क आकारण्यात येणार नाही. कोरोनामुळे उंचीवर मर्यादा घालण्यात आली होती. मात्र ही मर्यादा काढून टाकण्यात आली आहे, अशी घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.