अकोला : जिल्ह्यात गर्भधारणापुर्व व प्रसुतीपुर्व गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती मिळाल्यास टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी. संबंधीत व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्यास माहिती देणाऱ्या व्यक्तीस एक लक्ष रुपये बक्षीस स्वरुपात शासनातर्फे देण्यात येईल, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी केले. त्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३४४७५ किंवा www.amchimulgi.com या वेबसाईटवर तक्रार नोंदवावी,असेही सांगण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात पीसीपीएनडीटी जिल्हा दक्षता समिती सभा सोमवारी(दि.११) पार पडली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. सुचिता पाटेकर, मनपा आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, अन्न व औषध प्रशासन वि.द. सुलोचने, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद व तालुक्यातील वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते. जिल्ह्यात गर्भधारणापुर्व व प्रसुतीपुर्व गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती मिळाल्यास टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी. मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील संशयित सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करावी. यात स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेऊन ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, या मोहिमेची सर्वस्तरावर जनजागृती करावी. तसेच गर्भधारणापुर्व व प्रसुतीपुर्व गर्भलिंग निदान होत असल्यास संबंधीत व्यक्तीवर गुन्हा दाखल झाल्यास माहिती देणाऱ्या व्यक्तीस एक लक्ष रुपये बक्षीस स्वरुपात शासनातर्फे देण्यात येईल. जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यक्षेत्रात ३० तर मनपाक्षेत्रात १२२ सोनोग्राफी केन्द्र असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी दिली.विधी समुपदेशक अॅड. शुभांगी ठाकरे यांनी पीसीपीएनडीटी कायद्याची माहिती, केलेली कार्यवाही व जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्राची तपासणी अहवाल सादर केला.