बुलडाणा : जिल्ह्यातील ८ पालिकांची अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र आज ,५ जुलै रोजी जिल्ह्यातील ६ पालिकांनी यादी प्रसिद्ध झाली असून २ पालिकांची अंतिम यादी उद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणुकीची पूर्वतयारी जसजशी निवडणूक विभागाकडून करण्यात येत आहे तसे नगरपालिकेसाठी इच्छुक असलेल्या भावी उमेदवारांची धाकधूक वाढत आहे.चिखली, खामगाव, मलकापूर, नांदुरा, देऊळगाव राजा व जळगाव नगर परिषदच्या अंतिम मतदार याद्या आज प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र बुलडाणा व मेहकर पालिकेने प्रसिद्ध केलेल्या यादीवर हजारो हरकती दाखल करण्यात आल्या. यामुळे मुदतवाढ मिळूनही आजच्या निर्धारित तारखेला त्या प्रसिध्द करणे अशक्य ठरले. यामुळे आता त्या ६ तारखेला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले. यापूर्वी जिल्ह्यातील ८ पालिका प्रसाशनानी मतदार यादी प्रसिद्ध केल्या. मात्र या याद्यांवर २१ ते २७ जून दरम्यान हजारोंच्या संख्येत हरकती, आक्षेप घेण्यात आले. एकट्या मेहकरात ४ हजाराच्या आसपास हरकती घेण्यात आल्या. बुलडाणा पालिकेचा आकडा यापेक्षा जास्त होता. या हरकती व सूचनांचे योग्य निराकरण करून त्रुटीरहितअंतिम मतदार याद्या तयार करणे अशक्य ठरणार असल्याने आयोगाने त्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आज ५ जुलै रोजी अंतिम प्रभाग निहाय मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्याचे नियोजन होते. मात्र २ ठिकणी ते हुकले.