अकोला : भारतीय हवामान विभाग यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि.20 ते 25 दरम्यान जिल्ह्यात काहीठिकाणी विजांच्या कडकडाटासह 51 ते 75 मि.मी इतका पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विजा कडाडत असतांना नागरिकांनी खालील प्रमाणे काळजी घ्यावी.वीज वादळाची स्थिती जाणवताच टिव्ही, संगणक, इ. विद्युत उपकरणे स्त्रोतापासून (स्विचबोर्ड मधून) अलग करुन ठेवावीत. वीज वादळाच्या स्थितीत मोबाईल फोनचा वापर टाळावा. घरात वा सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. खिडक्या दारे बंद करावीत. झाडाखाली आश्रय घेऊ नये. वाहनावर प्रवास करीत असल्यास आपले वाहन विजेच्या खांबाजवळ वा झाडाखाली थांबवू नये. वीज कोसळल्यास मानवी हृदय व श्वसन प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. अशावेळी लगेच हृदयाजवळील भागास मालिश करावे व तोंडाद्वारे श्वसन प्रक्रियेस मदत द्यावी. दामिनी ॲप द्वारे वीजेबाबत पूर्वस्थिती जाणून घ्यावी. या कालावधीत नदी नाला काठावरील गावांना व शहरी भागातील सखल भागातील वस्त्यांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी, नाले, तलाव, बंधारे येथे पोहण्यास जाऊ नये. रस्त्यावरून, पुलावरुन पाणी वाहत असल्यास वाहने नेण्याबाबत दक्षता घ्यावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.