अमरावती : उन्हाची तीव्रता, पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली असताना अधिकारी मात्र वातानुकूलित दालनात बसून नागरिकांच्या समस्या, प्रश्नांकडे लक्ष देत नाही. चार दिवसांच्या आत पाणीटंचाई समस्या निवारण आणि विजेचा प्रश्न सोडविला गेला नाही,तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सडो की,पळो करून सोडेल, असा निर्वाणीचा इशारा आमदार रवि राणा यांनी शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीतून दिला. अमरावती शहर व तालुका, बडनेरा, भातकुली, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, परतवाडा, चिखलदरा, चांदूर बाजार, धारणी, तिवसा शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याअभावी होणारा त्रास निवारण्यासाठी आमदार रवि राणा यांनी आढावा घेतला. मजीप्रा, एमएसईबी, महसूल, जिल्हा परिषद, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक घेत पाणीटंचाई व भारनियमनाचा सामना करावा लागू नये म्हणून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार रवि राणा दिलेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती आणि पवित्र रमजान महिना या सारखे सर्वधर्मीय सण-उत्सव असून या सणासुदीच्या काळात आणि रखरखत्या उन्हात लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त आहेत. सोबतच पाणीपुरवठा अनियमित व कमी प्रमाणात होत असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पाणी प्रश्न अथवा वीजची समस्या त्वरित निकाल काढावी,अशी तंबी आमदार रवी राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली. एप्रिल महिन्यात ही स्थिती आहे, तर मे महिन्यात काय होईल, असा सवाल उपस्थित करून समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. बैठकीला अधिकाऱ्यांसह भातकुली नगराध्यक्ष योगिता कोलटेके, उपाध्यक्ष प्रतीक कांडलकर, उमेश ढोणे, सुमती ढोके, आशिष गावंडे, आशिष कावरे, मयूरी कावरे, राजू रोडगे, ओंकार मोहोळ, खुशाल गोंडाणे, विनोद कदम, रिजवान, मंगेश चव्हाण, गिरीश कासट, शंकर डोंगरे, सुनील भोसले, पुरुषोत्तम खर्चान उपस्थित होते.